शिलाँग: अधिकाधिक गोमांस खावं यासाठी मेघालयमधील भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुल्लई यांनी लोकांना प्रोत्साहन दिलं आहे. चिकन, मटण आणि माशांपेक्षा गोमांस जास्त खावं यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. यामुळे भाजप गोहत्या रोखणारा पक्ष असल्याची अल्पसंख्याक समाजाच्या मनातील धारणा दूर होईल, असं राज्य सरकारमध्ये पशुपालन मंत्री असलेले सनबोर शुल्लई यांनी म्हटलं.
सनबोर शुल्लई यांनी गेल्याच आठवड्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 'चिकन, मटन आणि माशांपेक्षा गोमांस अधिक खावं यासाठी मी लोकांना प्रोत्साहन देतो. त्यासाठी आग्रह धरतो. भाजप गोहत्येला प्रतिबंध करणारा पक्ष आहे असा गैरसमज अल्पसंख्यांकांच्या मनात आहे. तो यामुळे दूर होईल,' असं शुल्लई यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
भारत लोकशाही मानणारा देश आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ज्याला जे खायचं आहे, ती व्यक्ती ते खाऊ शकते, असं शुल्लई म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच्याशी मी संवाद साधेन आणि आसामच्या नव्या गाय कायद्यामुळे गायींची वाहतूक प्रभावित होणार नाही याची काळजी घेईन, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.
सध्या आसाम-मेघालय यांच्यातील सीमा प्रश्न पेटला आहे. गोळीबारात पोलिसांचे जीव गेले आहेत. त्यावरही शुल्लई यांनी भाष्य केलं. 'राज्याच्या सीमांचं आणि आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी पोलीस दलाचा वापर करण्याची हीच योग्य वेळ आहे. आसामचे लोक सीमावर्ती भागांत आमच्या लोकांना त्रास देत असतील, तर आम्ही केवळ चर्चा करू शकत नाही. आम्हाला योग्य वेळा कारवाई करावीच लागेल,' असं शुल्लई म्हणाले.