नवी दिल्ली : गेल्या काही आठवड्यांपासून कांदा, बटाटा आणि टाेमॅटाेचे भाव खूप वाढले आहेत. अनेक शहरांमध्ये टाेमॅटाेच्या दरांनी शंभरी गाठली आहे. मात्र, येत्या काही आठवड्यांमध्ये पुरवठा वाढल्यानंतर दर कमी हाेतील, अशी अपेक्षा आहे. सरकारी सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अनेक राज्यांमध्ये पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कांदा, बटाटा आणि टाेमॅटाेचे दर वाढले आहेत. प्रचंड उष्णता आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परंतु, लवकरच आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून टाेमॅटाे पुरवठा वाढणार आहे. त्यानंतर दर कमी हाेतील, असा अंदाज आहे.
मुबलक साठा
सरकारी सूत्रांनी सांगितले की, देशात सध्या २८३ लाख टन एवढा बटाट्याचा साठा आहे. गेल्या वर्षी बटाट्याचे उत्पादन कमी झाले हाेते. तरीही, देशांतर्गत गरज भागविण्यासाठी ताे पुरेसा आहे.
नवीन कांदा सप्टेंबरच्या आसपास
कांद्याचे दरदेखील वाढले आहेत. नवीन कांदा सप्टेंबरच्या आसपास बाजारात येण्याची अपेक्षा आहे. ताेपर्यंत कांद्याचे भाव वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यातच टाेमॅटाेचे दर देशभरात प्रचंड वाढले हाेते. अनेक ठिकाणी १५० ते २०० रुपये किलाे या दराने टाेमॅटाेची विक्री झाली हाेती.