नवी दिल्ली - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपानेभोपाळमधून उमेदवारी दिल्यापासून त्या नेहमीच चर्चेत आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर निवडणूक आयोगाने 72 तास अर्थात तीन दिवसांसाठी प्रचारबंदी लागू केली आली आहे. प्रचारादरम्यान बाबरी मशिदीसंदर्भात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. गुरुवारी (2 मे) सकाळी सहा वाजल्यापासून हा निर्णय लागू होणार आहे.
भोपाळमधूनभाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी बाबरी मशिदीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच त्याबाबत बोलताना आनंद व्यक्त केला होता. या कृत्याचा आपल्याला गर्व असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे याबाबत कारवाई म्हणून त्यांच्यावर 72 तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे. या काळात त्या कोणत्याही प्रचार रॅलीत, सभेत सहभागी होऊ शकणार नाहीत. तसेच कोणतीही मुलाखत तसेच प्रतिक्रियाही त्यांना देता येणार नाही.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या भोपाळमधील भाजपाच्या उमेदवार आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अयोध्येमध्ये 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यावेळी मी देखील त्यात सहभागी होते. मला त्याचा अभिमान आहे असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. बाबरी मशीद पाडताना मी सर्वात वरती चढले होते. देवाने मला ही संधी दिली त्याचा मला अभिमान आहे. त्या ठिकाणी राम मंदिर बांधले जाईल हे आम्ही नक्की निश्चित करु असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुलाखतीदरम्यान म्हणाल्या होत्या. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा यांना नोटीस बजावण्यात आली होती. तरी देखील साध्वी प्रज्ञा सिंह मी तिथे गेले होते यावर ठाम होत्या. तसेच मी ही गोष्ट नाकारणार नाही. मी अयोध्येला जाऊन राम मंदिर बांधण्यासाठी मदत करणार आहे. कोणीही मला त्यापासून थांबवू शकत नाही असे साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या होत्या. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर, देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. विरोधकांनीही साध्वी प्रज्ञा यांच्या विधानावरुन भाजपाला लक्ष्य केले होते. टीका झाल्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेऊन माफी मागितली. ते माझे व्यक्तीगत दु:ख होते असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले होते.