नवी दिल्ली - देशभरातील जनता गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा करत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. चुनाव का पर्व, देश का गर्व या घोषवाक्यासह यंदा लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम पार पडत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून ९७.८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं. त्यामध्ये, १.८२ कोटी नवीन मतदार आहेत. निवडणुकांच्या घोषणेनंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. याआधीही २०१४ आणि २०१९ मध्ये सात टप्प्यांत मतदान झाले होते. तत्पूर्वी, निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासमवेत लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर, आज राजीव कुमार यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, ही निवडणूक ७ टप्प्यात होत असून २८ मार्च रोजी पहिलं नोटीफिकेश जारी होणार आहे. तर, १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार, १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर, देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
देशात ७ टप्प्यात मतदान होणार
पहिला टप्पामतदान - १९ एप्रिल
दुसरा टप्पामतदान - २६ एप्रिल
तिसरा टप्पा मतदान - ७ मे
चौथा टप्पा मतदान - १३ मे
पाचवा टप्पामतदान - २० मे
सहावा टप्पा मतदान २५ मे
सातवा टप्पामतदान १ जून
महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार असून १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे?
>> पहिला टप्पा - १९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
>> दुसरा टप्पा २६ एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
>> तिसरा टप्पा ७ मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
>> चौथा टप्पा १३ मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
>> पाचवा टप्पा २० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली आहे. देशातील ९७.८ कोटी मतदारांपैकी ४९.७ कोटी पुरुष तर ४७.१ कोटी महिला मतदानाचा हक्क बजावतील. तर, ४८ हजार तृतीयपंथी मतदान करतील. त्यासाठी, ५५ लाख ईव्हीएम मशिन मतदानासाठी सज्ज असल्याचंही कुमार यांनी सांगितलं.
हे आहेत आव्हान
मसल्स पॉवर, मनी पॉवर आणि मिस इन्फॉरमेशन या गोष्टींचं आपल्यापुढे आव्हान आहे. त्यावर, मात करण्यासाठीही निवडणूक आयोगाने यंत्रणा उभारली असल्याचं कुमार यांनी सांगितले. तसेच, हिंसामुक्त आणि गैरव्यवहारविरहीत निवडणुका राबवणं हे प्राधान्य असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.
सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजप रिंगणात उतरली आहे, तर विरोधी पक्ष एकजूट होऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. गत, २०१९ मध्ये भाजपने ३०३ जागा जिंकून इतिहास रचला होता. ‘अब की बार, ३७० पार’चा नारा भाजपने दिला आहे. तर, एनडीएसह ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विरोधकांनीही भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी इंडिया आघाडीची वज्रमूठ बांधली आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.