अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने आणि अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक आयोगासमोर झालेल्या 2 तासांच्या सुनावणीनंतर हे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेत.
राहुल गांधी यांच्या उमेदवारीवर घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगाकडून चौकशी करण्यात आली. सोमवारी या आक्षेपावर निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात तब्बल दोन तास ही सुनावणी सुरु होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. त्यानंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांनी केलेले दावे फेटाळून लावले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर अमेठी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार ध्रुवलाल कौशल यांनी आक्षेप नोंदवला होता. राहुल गांधी यांचे खरे नाव राऊल विंची आहे. राहुल गांधी यांच्याकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात येत आहे असा दावा ध्रुव कौशल यांच्या वकीलांकडून करण्यात आला होता. यानंतर राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला होता.
शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये राहुल गांधी यांच्या वकीलांनी अमेठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोमवारपर्यंतची वेळ मागून घेण्यात आली होती. त्यामुळे ही सुनावणी सोमवारी पार पडली. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा अपक्ष उमेदवाराने दावा केला होता. यावर काँग्रेसकडून काहीच उत्तर आलं नव्हतं. राहुल गांधी यांच्या कायदेशीर सल्लागारांनी शनिवारी निवडणूक आयोगासमोर या सुनावणीसाठी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला त्यामुळे यावर शंका उपस्थित करून भाजपानेही राहुल गांधी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र आज झालेल्या दोन तासांच्या सुनावणीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.