खरी राष्ट्रवादी कुणाची?; शरद पवार-अजित पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 08:49 PM2023-08-16T20:49:18+5:302023-08-16T20:56:52+5:30
मागील महिन्याच्या २ जुलैला राष्ट्रवादी नेते अजित पवारांसह ८ दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह यावर अजित पवारांनी दावा केल्यानंतर त्याबाबतची कागदपत्रे अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवून दिली. त्यानंतर शरद पवार गटानेही त्यांचे म्हणणे निवडणूक आयोगाला कळवले होते. शरद पवार-अजित पवार गटातील वादात पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नोटीस पाठवून ३ आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. ८ सप्टेंबरपर्यंत नोटीसीला उत्तर द्यावे लागेल.
अजित पवार गटाने ३० जून निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्ष बदलल्याची माहिती दिली. या पत्रात अजित पवारांची अध्यक्षपदी निवड केल्याचे सांगितले. खरी राष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा अजितदादा गटाकडून करण्यात आला. निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाने नाव आणि चिन्ह यावर दावा करणारी याचिका दाखल केली होती.
३० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी समिती सदस्यांनी सह्यांद्वारे पक्षाचे अध्यक्ष बदलल्याचे सांगितले. या प्रस्तावावर विधिमंडळ आणि संघटनात्मक दोन्ही सदस्यांच्या सह्या आहेत. प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष कायम राहतील. परंतु शरद पवार गटाने राष्ट्रवादीत कुठलीही फूट पडली नाही. शरद पवारच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं म्हटलं होते. त्यावर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला उत्तर देण्यास सांगितले आहे.
अजित पवारांनी केलेल्या याचिकेवरून निवडणूक आयोगाने अद्याप पक्षात वाद असल्याचं नोंद केलं नाही. सध्या दोन्ही गटानं दिलेल्या कागदपत्राची पडताळणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला ८ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आलेल्या उत्तरावरून वाद असल्याचे निश्चित झाल्यानंतर निवडणूक चिन्हाबाबत परिच्छेद १५ अन्वये कार्यवाहीला सुरुवात केली जाईल असं सूत्रांनी सांगितले.
२ जुलैला अजित पवारांनी घेतली होती शपथ
मागील महिन्याच्या २ जुलैला राष्ट्रवादी नेते अजित पवारांसह ८ दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश होता. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालोय असा दावा केला. त्याचसोबत पुढील निवडणुका घड्याळ चिन्हावरच लढणार असल्याचे म्हटलं होते.