सिद्धार्थनगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकारण चांगलंच तापले आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका आमदाराला वादग्रस्त विधान करणे चांगलेच भोवले आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमधील डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने 24 तासांची बंदी घातली आहे. राघवेंद्र प्रताप सिंह यांनी वादग्रस्त विधान केले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, जे हिंदू त्यांना मत देत नाहीत, त्यांच्यामध्ये मुस्लिमांचे रक्त आहे. राघवेंद्र प्रताप सिंह यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
आचारसंहितेचे उल्लंघन आणि समाजात द्वेष पसरवल्याबद्दल आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपा आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने घातलेली बंदी सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाली असून मंगळवारी सकाळी 6 वाजता संपेल. यादरम्यान राघवेंद्र प्रताप सिंह यांना प्रचाराची परवानगी दिली जाणार नाही.
भाजपा आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले आहे की, विरोधकांच्या षडयंत्रामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला 24 तास प्रचार करण्यापासून रोखले आहे, मात्र 3 मार्चला डुमरियागंजची राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी जनता या षडयंत्राला नक्कीच उत्तर देईल. विशेष म्हणजे भाजपाचे आमदार राघवेंद्र प्रताप सिंह हे हिंदू वाहिनीचे प्रभारी आहेत. या संघटनेची स्थापना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती.
दरम्यान, राघवेंद्र सिंह हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील राजकारण चांगलेच तापले आहे. पूर्वांचलमधील सहाव्या टप्प्यातील दहा जिल्ह्यांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रभावाने कमळ खुलले आहे. त्याचवेळी योगींच्या बालेकिल्ल्यात पिपराईचमध्ये दाखल होऊन अखिलेश यांनी सायकल धावणार याचे संकेत दिले, तर आजवरची थेट लढाईची भाषा बदलत असून भाजप स्वतः बसपला तिसरी ताकद म्हणत राजकीय डाव टाकत आहे.