नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. संजय सिंह यांच्या सुटकेनंतर पक्षाला काहीसा दिलासा मिळाला असतानाच आता निवडणूक आयोगाने दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांना नोटीस पाठवली आहे. भाजपाच्या तक्रारीनंतर आयोगाने ही नोटीस पाठवली आहे.
निवडणूक आयोगाने आतिशी यांना ६ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले. दरम्यान, आपल्याला भाजपामध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती, असा आरोप आतिशी यांनी केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने मंत्री आतिशी यांना कथितरित्या भाजपाच्या घोडेबाजारीच्या प्रयत्नाबाबत केलेल्या विधानाबाबत वस्तुस्थिती आयोगासमोर मांडण्यास सांगितले आहे.
याआधी भाजपाच्या दिल्ली युनिटने आतिशी यांना बदनामीची नोटीस पाठवली होती आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीद्वारे भाजपामध्ये सामील होण्याच्या दाव्याबद्दल जाहीरपणे माफी मागायला सांगितले होते. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना आतिशी म्हणाल्या होत्या की, 'आप'च्या नेत्यांवर अशा माध्यमातून हल्ला करण्याऐवजी भाजपाने निवडणुकीत आपल्या पक्षाविरोधात लढावे.
दरम्यान, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी दावा केला होता की, त्यांच्यासह सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा आणि दुर्गेश पाठक यांच्यासह चार वरिष्ठ आप नेत्यांना लवकरच अटक केली जाईल. तसेच, मला एकतर भाजपामध्ये सामील होण्यास सांगितले होते.तसेच महिनाभरात ईडीद्वारे अटक होण्यास तयार राहा, असे सांगितले होते असा दावाही अतिशी यांनी केला होता.
भाजपाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आतिशी यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे आणि त्यांच्या दाव्याबद्दल त्यांच्याकडून जाहीर माफी मागितली आहे. "आतिशी यांच्याशी कोणी, कधी आणि कसा संपर्क साधला, याचा पुरावा देण्यात त्या अपयशी ठरल्या. दिल्लीत 'आप' संकटाचा सामना करत आहे, त्यामुळे निराशेतून असे खोटे आणि निराधार आरोप करत आहेत, असे वीरेंद्र सचदेवा म्हणाले.