नवी दिल्ली – मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेत निवडणूक तारखा जाहीर करू शकते.
सूत्रांच्यानुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी आणि टप्प्यांमध्ये या राज्यांमध्ये मतदान होऊ शकते. मागील वर्षीप्रमाणे राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरम, तेलंगणा इथं एका टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात मतदान घेतले जाऊ शकते. मतदानाच्या तारखा वेगवेगळ्या असल्या तरी सर्व राज्यांच्या निवडणुकीचे निकाल एकत्र करण्याबाबतही आयोग घोषणा करू शकते.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत बोलाल तर, यावर्षीच्या अखेरीस निवडणूक होण्याची अपेक्षा होती. मध्य प्रदेशात २३० जागांसाठी नोव्हेंबर २०२३ अथवा त्याअगोदर निवडणूक घेतली जाईल सांगितले जात होते. मध्य प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ ६ जानेवारी २०२४ रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यात मागील विधानसभा निवडणुका २०१८ मध्ये घेतल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकून राज्यात सरकार स्थापन केले. कमलनाथ हे राज्याचे मुख्यमंत्री बनले होते.
परंतु मार्च २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिला आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश घेतला. त्यामुळं काँग्रेस सरकार अल्पमतात आले आणि कमलनाथ सरकार कोसळले. त्यानंतर भाजपाने राज्यात सरकार बनवले आणि शिवराज सिंह चौहान हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. तर राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ १४ जानेवारी २०२४ रोजी संपत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्यातील २०० जागांसाठी मतदान होऊ शकते. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन केले आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले.
छत्तीसगडमध्ये ९० जागांसाठी मतदान
छत्तीसगडमधील ९० जागांसाठी मतदान होणार आहे. छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आणि भूपेश बघेल राज्याचे मुख्यमंत्री झाले.
मिझोरमच्या ४० जागांवर मतदान
या वर्षाच्या अखेरीस ४० जागांसह मिझोरममध्येही निवडणुका होणार आहेत. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२३ रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये मिझो नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आणि राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर झोरमथांगा मुख्यमंत्री झाले.