नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
राहुल गांधी यांनी बलात्काराच्या मुद्द्यावरुन 'मेक इन इंडिया' ऐवजी 'रेप इन इंडिया' असे वक्तव्य केले होते. याप्रकरणी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या महिला खासदारांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंडमधील मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस पाठवून राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी झारखंडमधील एका सभेत राहुल गांधी यांनी 'मेक इन इंडिया'ची खिल्ली उडवली होती. त्यावेळी प्रचारादरम्यान बलात्काराच्या मुद्द्यावरुन 'मेक इन इंडिया' ऐवजी 'रेप इन इंडिया' असे वक्तव्य करत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर लोकसभेत गदारोळ माजला होता. भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. तसेच, राहुल गांधी यांनी सर्व महिलांची आणि देशाची माफी मागावी, अशी मागणी स्मृती इराणी यांनी लोकसभेत केली होती. दरम्यान, झारखंड विधानसभेसाठी आज चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे.