पीएम नरेंद्र मोदी सिनेमाला निवडणूक आयोगाची नोटीस, 30 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 02:03 PM2019-03-27T14:03:46+5:302019-03-27T14:05:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट पीएम नरेंद्र मोदी यावर दिवसेंदिवस वाद वाढत चाललेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट पीएम नरेंद्र मोदी यावर दिवसेंदिवस वाद वाढत चाललेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. निर्मात्यांनी 30 मार्चपर्यंत आपलं म्हणणं मांडावे असं निवडणूक आयोगाकडून बजावण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 5 एप्रिल 2019 पीएम नरेंद्र मोदी या सिनेमा रिलीज होणार आहे. ऐन निवडणुकीच्या दरम्यान चित्रपट प्रदर्शित झाला तर हे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल अशा तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने याचे स्पष्टीकरण चित्रपट निर्मांत्याकडून मागवलं आहे.
EC sends notice to 4 producers of film 'PM Narendra Modi'. Congress & CPM had complained to EC about the film's release, saying it's being done with political intent. EC had sent notices to two newspapers on 20 March over publishing 'PM Narendra Modi' film's poster for promotions pic.twitter.com/CHcBiIDW4R
— ANI (@ANI) March 27, 2019
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी लेखी तक्रार देत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे त्याचा विरोध करत या सिनेमावर निवडणूक आयोगाने बंदी आणावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पीएम नरेंद्र मोदी सिनेमाचे निर्माते, म्युझिक कंपनी यांना नोटीस पाठवली आहे. पीएम नरेंद्र मोदी सिनेमा 19 मे नंतर रिलीज करण्यात यावा अशीही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंह आणि सुरेश ओबेरॉय यांनी केली आहे. सिनेमामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्य भूमिका साकारली आहे.
डीएमके आणि मनसेही केला विरोध
पीएम नरेंद्र मोदी सिनेमामध्ये एका सामान्य कुटुंबापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास दाखविण्यात आला आहे. मागील महिन्यात या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरनंतर विरोधी पक्षाने या सिनेमावर आक्षेप घेतला. काँग्रेससोबत डीएमके आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी केली. तर मनसेने पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा आचारसंहितेचे उल्लंघन करणारा आहे त्यामुळे जर हा सिनेमा प्रदर्शित झाला तर खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.