Lok Sabha Election 2024, EVM machine: लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यातील मतदान १ जूनला पूर्ण झाले. आज ५४३ पैकी ५४२ जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. मतमोजणीच्या दिवशी आणखी एक गोष्ट सातत्याने चर्चेत असते ती म्हणजे, EVM मशिन. EVM मशिनमध्ये छेडछाड केली जात असल्याचा आरोप अनेक वेळा विरोधकांकडून केला जात आहे. तर इव्हीएममध्ये काहीही छेडछाड केली जाऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाने (Election Commission of India) वारंवार सांगितले आहे. असे असताना आता काँग्रेसचे जयपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप सिंह खाचरियावास (Pratap Singh Khachariyavas) यांच्याकडून एक विधान करण्यात आले आहे.
काँग्रेस नेते मतमोजणीआधी म्हणाले, "भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) हॅक करणाऱ्याला बक्षीस जाहीर केले पाहिजे आणि जर कोणी हे उपकरण यशस्वीरित्या हॅक केले तर ही मोजणी यंत्रणा त्वरित बदलली पाहिजे. ईव्हीएमवर इतके प्रश्न उपस्थित केले जात असतील, तर या निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर, निवडणूक आयोगाने पुढे येऊन ईव्हीएम लोकांसमोर ठेवावे. हॉलमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवून EVM हॅक करण्याचा प्रयत्न करू द्यावा आणि जर तसे कोणी केले, त्यांना बक्षिस द्यावे," असे खाचरियावास म्हणाले.
"EVM मध्ये प्रोग्रामिंग कोण अपलोड करत आहे? तुम्ही उमेदवारांना समान प्रोग्रामिंग देत नाही. ज्याची चर्चा होत नाही. हा कार्यक्रम उमेदवारांना उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत. पण निवडणूक आयोगाला हे करायचे नाही. त्यामुळे त्यांनी हे करावे. सत्य बाहेर येईल. निवडणूक आयोगाला हे मान्य असेल का? निवडणूक आयोग पारदर्शक असला पाहिजे. जो कोणी हॅक करेल त्याला निवडणूक आयोगाने बक्षीस जाहीर करावे आणि जर कोणी ते हॅक करू शकत असेल तर मतदान प्रक्रिया बदलून घ्यावी," असे आव्हान खाचरियावास यांना दिले.
दरम्यान, विशेष म्हणजे 2017 मध्ये निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना ईव्हीएम चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. फक्त दोन विरोधी पक्षांनी - NCP आणि CPI(M) यांनी हे आव्हान स्वीकारले होते, मात्र नंतरच्या टप्प्यात त्यांनाही ते शक्य झाले नव्हते.