चेन्नई : अनेक वर्षांनंतर सोमवारी आकाशात सर्वात मोठ्या पूर्णचंद्राला(सुपरमून) ग्रहण लागल्याचे दुर्लभ दृश्य बघायला मिळेल. पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने गडद लाल रंगांचा चंद्र नेहमीच्या सर्वसामान्य आकारापेक्षा मोठा दिसतो, त्याला सुपरमून असे संबोधले जाते. खग्रास चंद्रग्रहण आणि सुपरमून असा दुर्मीळ योग खगोलप्रेमींना अनोखी संधी देणार असल्याचे खगोल विद्या आणि अंतराळ विज्ञान संशोधन तज्ज्ञ ‘स्पेस’ या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने सर्वात मोठा भासणारा चंद्र सोमवारी शरद पौर्णिमेच्या रात्री बघता येणार आहे.भारतीय वेळेनुसार रात्री ८.२१ वाजता सुपरमूनचे दर्शन घडेल. यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुपरमूनचे दर्शन घडेल. सुपरमूनला ग्रहणाच्या विविध कलांनी ग्रासल्याचे दृश्य मात्र भारतात दिसणार नाही. २७-२८ सप्टेंबरच्या रात्री अमेरिका, अटलांटिक, ग्रीनलँड, युरोप, आफ्रिका आणि प. आशियात हे चंद्रग्रहण बघायला मिळेल. भारतात काही ठिकाणी चंद्र अस्ताला जात असताना हे दृश्य बघता येईल. दिल्लीत पहाटे ५.४३ वाजता चंद्रग्रहण दिसू शकेल. तेजोमय असा सुपरमून दुर्बिणीने अधिक प्रकाशमान दिसेल. चंद्र आपल्या कक्षेत पृथ्वीच्या अगदी जवळच्या बिंदूवर असेल तेव्हाच सुपरमून दिसण्याचा योग जुळून येतो. (वृत्तसंस्था)
‘सुपरमून’ला आज ग्रहण
By admin | Published: September 28, 2015 2:47 AM