नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019-20 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला. या सर्व्हेनुसार 2011-12 ते 2017-18 या कालावधीत देशातील 2.62 कोटी लोकांना नवीन रोजगार मिळाल्याचे समोर आले आहे.
सर्व्हेनुसार 2011-12 ते 2017-18 या काळात देशातील शहरी आणि ग्रामीण भागात 2.62 कोटी लोकांना नोकरी मिळाली. ही आकडेवारी संघटीत क्षेत्रातील आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार नोव्हेंबर 2019 पर्यंत एकूण 69.03 लाख लोकांना पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत नोकरी मिळाली. तर मागील सहा वर्षांच्या काळात महिला रोजगारामध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
संघटीत क्षेत्रात अधिक नोकऱ्या उपलब्ध करणे तसेच गुणवत्तेत सुधारणा करण्यावर सरकारचा फोकस होता. त्यामुळे नियमीत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाटा 2010-11 च्या 18 टक्क्यांच्या तुलनेत 2017-18 मध्ये 23 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये एकूण 2.62 कोटी नोकऱ्या देण्यात आल्या. यामध्ये 1.21 कोटी नोकऱ्या ग्रामीण आणि 1.39 कोटी नोकऱ्या शहरी भागात देण्यात आल्या आहेत.
सर्व्हेनुसार 2019-20 या सरत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 5 टक्के राहिला आहे. तर 2020-21 या आगामी आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.50 टक्के राहील, असा अंदाज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.