ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत आर्थिक सर्वैक्षण अहवाल सादर केला आहे. सोमवारी २९ फेब्रुवारीला अरुण जेटली अर्थसंकल्प मांडणार आहेत तत्पूर्वी आज त्यांनी आर्थिक सर्वैक्षण अहवाल सादर केला. या अहवालात अरुण जेटली यांनी जागतिक आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याचं म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर मात्र याचा कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.
या सर्वेक्षण अहवालात रोजगार दरवाढीचा तसंच उत्पादन क्षेत्रात वृद्धी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१५-१६ साली विकासदर ७ ते ७.५ टक्के होता तर २०१६-१७मध्ये महागाई दर ७ ते ७.१५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१३ पासून एफडीआयमध्ये २२ टक्यांची वाढ झाल्याचं सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. देशातील वातावरण बदलाचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही असंही अहवालात सांगितल आहे.
२०१५-१६ मध्ये वित्तीय तुटीचे लक्ष्य ३.९ टक्के ठेवण्यात आले होते, हे लक्ष्य पूर्ण होताना दिसत आहे तर सेवा क्षेत्राचा विकासदर ९.२ टक्के राहणार असल्याचंही आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) २०१६-१७ मध्ये ४.५- ५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०१७ मध्ये चालू खात्यातील तूट निव्वळ देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १- १.५ टक्के इतकी राहण्याची शक्यता आहे.