मुंबई - विकासाचा दर गेल्या सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी सलग नीचांकी असून, उत्पादनात मंदी आल्याचे बँकिंग व इतर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडून सातत्याने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरवरुन एक फोटो शेअर करत देशातील अर्थव्यवस्थेवर भाष्य केलंय. विशेष म्हणजे अर्थव्यवस्थेचा प्रश्न कोणाकडे विचारायचं? असा सवालही त्यांनी विचारलाय.
उत्पादन क्षेत्रातील मंदीमुळे सकल देशी उत्पादनाचा (जीडीपी) वेग गेल्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत खाली येऊन 4.5 टक्क्यांवर आला. जीडीपी वाढीचा दर हा गेल्या एप्रिल ते जून तिमाहीत पाच आणि 2018 च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सात टक्के होता. दास यांनी वाढीला चालना मिळेपर्यंत व्याजाचे दर कमी केले जातील, असे यापूर्वी म्हटले होते व त्यामुळे तीन डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या आर्थिक धोरण आढावाच्या बैठकीत व्याजदरात कपात केली जाईल, असा आत्मविश्वास, एका बँक अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केला. मात्र, देशातील अर्थव्यवस्थेवर बोलताना प्रकाश राज यांनी मोदींना लक्ष्य केलंय.
देशाची अर्थव्यवस्था आयसीयुमध्ये आहे. विकास आणि विश्वास इन्क्युबेटरवर आहे. मग, आम्ही कोणाला प्रश्न विचारायचा?. नेहरूंना की टिपू सुल्तानला? असा प्रश्न प्रकाश राज यांनी विचारलाय. त्यासोबतच, एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये निर्मला सितारमण संसदेत भाषण करत असताना दिसत आहेत. तर, या फोटोत सितारमण यांच्या पाठिमागे मंत्र्यांनी चक्क डुलकी घेतल्याचं दिसून येतंय. केंद्रीयमंत्री महेंद्रनाथ पांडेय आणि फग्गनसिंह कुलस्ते हे झोपा काढत असल्याचं दिसून येतंय. दरम्यान, प्रकाश राज यांनी बंगळुरूमधून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.