नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था कोणत्याही संकटात नाही. हिरवे कोंब दिसून येत असून देश झपाट्याने ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले.
लोकसभेत अर्थव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना सीतारामन यांनी म्हटले की, विदेशी गुंतवणुकीत वाढ झाली आहे. कारखाना उत्पादन वाढत आहे. मागील तीन महिन्यांपासून जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांच्या वर गेलेले आहे. विदेशी चलनाचा साठा सार्वकालिक उच्चांकावर आहे. शेअर बाजार तेजीत आहे. अर्थव्यवस्थेत हिरवे कोंब फुटत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. हिरव्या कोंबांचे संकेत देणारे असे सात निदर्शक अर्थव्यवस्थेत दिसून येत आहेत.
सीतारामन यांनी सांगितले की, वृद्धीला चालना देणाऱ्या चार क्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. खाजगी गुंतवणूक, निर्यात आणि खाजगी व सार्वजनिक उपभोग यांचा त्यात समावेश आहे. सार्वजनिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारने डिसेंबरमध्ये ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन’ची घोषणा केली आहे. आगामी चार वर्षांत म्हणजेच २०२४-२५ पर्यंत पायाभूत विकासासाठी १.०३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार आहे. उपभोग वाढावा यासाठी २०१९-२० च्या रबी आणि खरीप हंगामातील सर्व पिकांच्या किमान आधारभूत किमतींत वाढ करण्यात आली आहे.