नवी दिल्ली : भाषणामध्ये सतत पं. जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचा उल्लेख करणारे पंतप्रधान देशातील बेरोजगारीविषयी मात्र मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या उत्तराचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, ढासळती अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी हे देशापुढील आजचे सर्वात मोठे प्रश्न आहेत. पण त्याला पंतप्रधान सातत्याने बगल देऊ न भलत्याच विषयांवर बोलत आहेत.
ते म्हणाले की, पंतप्रधान आज सुमारे दीड तास लोकसभेत बोलले. त्यापैकी किमान दोन मिनिटे तरी कोट्यवधी तरुणांना रोजगार देण्यासाठी काय केले आणि काय करणार आहात, यावर त्यांनी बोलायला हवे होते. पण त्यांनी त्याविषयी अवाक्षरही काढले नाही.पूर्वी पंतप्रधान मोदी नेहमी मेक इन इंडिया, स्टार्ट अप, ५ अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था यांवर बोलत असायचे. आता मात्र या विषयांवर वा देशापुढील समस्यांवर न बोलता, ते पाकिस्तान, बांग्लादेश व जवाहरलाल नेहरू यांच्यावरच बोलू लागले आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान, अर्थमंत्री अयशस्वी : पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे दोघेही तरुणांना रोजगार देण्यात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.