नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरला आहे. तथापि, रोजगाराच्या बाबतीत त्यामुळे कोणताही फरक पडलेला नाही, तसेच लोकांच्या मिळकतीतही फारशी वाढ झालेली नाही. २५ वर्षीय अशोक कुमार ट्रक ड्रायव्हर आहे. १३ जणांच्या कुटुंबात तो एकटाच कमावता आहे. त्याला महिन्याला १0 हजार रुपये मिळतात. त्यात त्याचे भागत नाही. त्याला हे काम सोडायचेय; पण त्याच्या समोर कोणताही पर्याय नाही. काम मिळत नसल्यामुळे त्याचा भाऊ गेल्या वर्षीच उत्तर प्रदेशातील आपल्या गावी परतला. आपल्यालाही असेच गावी जावे लागेल का, अशी भीती अशोक कुमारला वाटते. बुधवारी जारी झालेल्या आकडेवारीनुसार, जूनमधील भारताचा वृद्धीदर घसरून ७.१ टक्के झाला. हा १५ महिन्यांचा नीचांक आहे. हा दर जगातील अन्य देशांच्या तुलनेत जास्त असला तरी, लक्षावधी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अर्थव्यवस्था सक्रिय करण्यास तो पुरेसा नाही. २0१५ च्या तुलनेत रोजगारनिर्मिती दोन तृतियांशने घटली आहे. अर्थव्यवस्थेची वाढ आणि रोजगार निर्मितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बिघडत चालले आहे. एचडीएफसी बँकेच्या अभ्यासानुसार, अर्थव्यवस्था १ टक्क्याने वाढल्यास रोजगाराचे प्रमाण फक्त 0.१५ टक्क्यांनीच वाढते. २000 मध्ये हे प्रमाण 0.३९ टक्के होते. याचाच अर्थ रोजगार निर्मिती अध्यापेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी १0 वर्षांत २५0 दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. तथापि, हे उद्दिष्ट सध्या तरी दृष्टीपथात दिसत नाही. अशोक कुमारने सांगितले की, एका नोकरीसाठी २0 जण मुलाखत द्यायला येतात. त्यामुळे घासाघीस करणे परवडत नाही. आकडेवारीनुसार, भारतातील १.३ अब्ज लोक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यात वाढच होत आहे. त्यामुळे कामकाजी वयाची लोकसंख्या भारतात सर्वाधिक होईल. ही लोकसंख्या उपयुक्त ठरेल की, ओझे हे रोजगार किती निर्माण होतो, यावरूनच ठरेल. शहरी भागातील बेरोजगारी ११ टक्क्यांवरबीएसई आणि सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी (सीएमआयई) यांनी संयुक्तरीत्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार आॅगस्टमध्ये शहरी भागातील बेरोजगारी वाढून ११.२४ टक्क्यांवर गेली आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीत प्रमाण ९.१८ टक्के आहे. राष्ट्रीय पातळीवर बेरोजगारीचे प्रमाण ९.८४ टक्के आहे. बीएसई-सीएमआयईने देशातील पहिला हाय फ्रिक्वेंसी डाटा यंदाच एप्रिलमध्ये सुरू केला आहे.
अर्थव्यवस्था वेगात; रोजगार मात्र जैसे थे!
By admin | Published: September 03, 2016 2:53 AM