कोरोनामुळे ४१ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. सर्वच प्रकारचे उद्योगधंदे बंद झाल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटातून देशाला जावे लागणार आहे. अशातच शासनाकडून अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या आदेशानुसार काही भागांत मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आणि पहिल्याच दिवशी अनेक राज्यांनी रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचे समोर आले. सोशल मीडियावर मद्यविक्री सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या जोक्सचा वर्षाव होतोय.
अनेकांच्या दारूची बिलं देखील व्हायरल झाली आहेत. यातून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. एका पठ्ठ्याने एक नाही दोन नाही तर चक्क ९५ हजारांची दारू विकत घेतल्याचे समोर आले आहे. हा आकडा बघून भल्या भल्यांची बोलती नाही बंद झाली तरच नवल. त्यामुळेच सोशल मीडियावर उपरोधिकपणे या तळीरामांचा उल्लेख 'अर्थव्यवस्था तारणारे वॉरियर्स' असा केला जातोय. वाईन शॉप उघडण्याधीच काही शहरांत तर दोन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. बहुतांश शहरात दारूच्या दुकानांपुढे फिजिकल डिस्टन्सिंग लागू करण्यासाठी पोलिसांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली.
दिल्ली सरकारने सोमवारी रात्री दारूवर विशेष कोरोना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तेथे एमआरपीवर ७०% वाढीव पैसे द्यावे लागतील. नवीन नियम मंगळवारी सकाळपासून लागू करण्यात आला आहे. आता तळीरामांच्या खिशाला दारू विकत घेणे कितपत परवडणारे आहे हेही पाहणे रंजक ठरणार आहे. तसेच यातून होणारी कमाई कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांवर वापरली जाणार आहे.