पश्चिम बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर तपास यंत्रणा पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ईडी पथकाने आज पहाटे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारच्या दोन मंत्र्यांच्या घरावर छापा टाकला. त्यांच्या दोन्ही घरांवर छापे टाकण्यात येत आहेत. हा छापा महापालिकेच्या नोकरी घोटाळ्याशी संबंधित आहे. ईडीची एक टीम अग्निशमन सेवा मंत्री सुजित बोस यांच्या दोन ठिकाणी पोहोचली आहे, तर दुसरी टीम मंत्री तपस रॉय यांच्या निवासस्थानी छापे टाकत आहे. तसेच या दोन मंत्र्यांशिवाय पालिकेच्या माजी उपाध्यक्षांच्या घरावरही ईडीचे छापे सुरू आहेत.
काही दिवसापूर्वी रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक गेले होते, यावेळी गावकऱ्यांच्या जमावाने ईडी पथकावर हल्ला केला. जमावाने ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफ जवानांच्या वाहनांनाही लक्ष्य केले. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर तपास संस्थेचे कार्यकारी संचालक राहुल नवीन कोलकाता येथे पोहोचले होते. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना घाबरू नका, निर्भयपणे चौकशी करा, असे सांगितले होते.
ईडी अधिकार्यांशी बैठक घेतल्यानंतर प्रभारी संचालकांनी सीएपीएफ दलाच्या सुरक्षा कर्मचार्यांशी समन्वय बैठक घेतली. बैठकीत, छाप्यांदरम्यान ईडी अधिकार्यांसह सीएपीएफच्या तैनातीची योजना तयार करण्यात आली. अधिकार्यांसोबतच महिला पोलिसांवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून अडथळे निर्माण करणार्या महिलांना दूर करता येईल, असे मत कार्यकारी संचालक राहुल नवीन यांनी व्यक्त केले.