लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीची जोरदार कारवाई सुरू आहे. केंद्रीय एजन्सीने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार के. डी. सिंह यांच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग एक्ट (PMLA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांची चिटफंड कंपनी अल्केमिस्ट ग्रुपवर कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे एक विमान आणि हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील 29 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता आणि फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, हा तपास सीबीआय, उत्तर प्रदेश पोलीस आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरशी संबंधित आहे. अल्केमिस्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि अल्केमिस्ट टाउनशिप इंडिया लिमिटेड यासारख्या कंपन्यांच्या माध्यमातून चिटफंड समूहाने सर्वसामान्यांकडून 1,800 कोटींहून अधिक रक्कम घेतल्याचा आरोप आहे. गुंतवणुकदारांना फ्लॅट आणि प्लॉट इत्यादी देण्याचे "खोटी आश्वासने" दिली गेली. ईडीने एका निवेदनात म्हटलं आहे की, पीएमएलए अंतर्गत मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आणि त्यामध्ये विमानाचा समावेश आहे.
ईडीने यापूर्वी 10.29 कोटी रुपयांचे डिमांड ड्राफ्ट जप्त केले होते. के डी. सिंह यांच्या कंपनीला (अल्केमिस्ट) ही रक्कम ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC) पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या विमान कंपन्यांना पेमेंट करण्यासाठी वापरायची होती. ईडीने सांगितलं की, ही विमाने टीएमसीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पक्षाचे आमदार आणि माजी रेल्वे मंत्री मुकुल रॉय, मुनमुन सेन आणि खासदार नुसरत जहाँ या स्टार प्रचारकांसाठी वापरली होती.
कोण आहेत के. डी. सिंह?
के.डी. सिंह यांचं पूर्ण नाव कंवर दीप सिंह असून ते राज्यसभेचे माजी खासदार आहेत. याआधीही ईडीला त्यांच्या घरावर छापे टाकल्यावर अनेक महत्त्वाची कागदपत्र, परकीय चलन आणि रोकड सापडली होती. 2018 मध्येच के.डी. सिंह यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत खटला सुरू करण्यात आला होता. ED ने 2016 मध्ये अल्केमिस्ट इन्फ्रा रियल्टी लिमिटेड विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी, के.डी. सिंह यांची सुमारे 239 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, ज्यात रिसॉर्ट्स, शोरूम आणि बँक अकाऊंट यांचाही समावेश होता.