ED Action On DMK MP S Jagathrakshakan : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फेमा प्रकरणात तामिळनाडूतील डीएमकेचे खासदार आणि व्यावसायिक एस जगतरक्षकन (DMK MP S Jagathrakshakan ) आणि त्यांच्या कुटुंबावर तब्बल 908 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, त्यांची 89 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.
ईडीने सोशल मीडिया साईट एक्सवर केलेल्या पोस्टद्वारे सांगितले की, FEMA च्या कलम 37A अंतर्गत एस जगतरक्षकन यांची 89.19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सोमवारी (26 ऑगस्ट 2024) जारी केलेल्या आदेशानुसार सुमारे 908 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी आयकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी खासदार जगतरक्षकन यांच्या घर आणि कार्यालयासह 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते.
काय आहे प्रकरण ?1 डिसेंबर 2021 रोजी केंद्रीय एजन्सीने FEMA च्या कलम 16 अंतर्गत DMK खासदार जगतरक्षकन, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि संबंधित कंपनीविरुद्ध FEMA तक्रार दाखल केली. ही तक्रार 2017 मध्ये सिंगापूरमधील एका शेल कंपनीमध्ये 42 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सिंगापूरचे शेअर्स घेण्याशी संबंधित आहे. ईडीने असेही म्हटले आहे की, जगतरक्षकन यांनी श्रीलंकेतील एका कंपनीत सुमारे 9 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तक्रारीत 11 सप्टेंबर 2020 रोजी मालमत्ता जप्त करण्याची मागणीही करण्यात आली होती. ईडीच्या कारवाईविरोधात द्रमुक खासदाराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिका यावर्षी 23 जुलै रोजी फेटाळली होती.
एस जगतरक्षकन यांचा परिचय76 वर्षीय एस जगतरक्षकन द्रमुकचे खासदार असून, अरकोनम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते चेन्नईस्थित एकॉर्ड ग्रुपचे संस्थापकही आहेत. त्यांची कंपनी हॉस्पिटॅलिटी, फार्मास्युटिकल्स, मद्य उत्पादनाचा व्यवसाय करते. याशिवाय ते भारतीय उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (BIHER) मालक आहेत. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए-2 सरकारमध्ये जगतरक्षकन राज्यमंत्री होते.