ईडीने मंगळवारी झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सहायक संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर यांना अटक केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने सोमवारी अनेक ठिकाणांच्या झडतीदरम्यान 35 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड आणि काही कागदपत्रं जप्त केली होती.
सोमवारी ईडीच्या छाप्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी बॅगेतून नोटांचे बंडल काढताना दिसत आहेत. यानंतर रोख रक्कम मोजण्यासाठी नोट मोजण्याचं यंत्र बसवण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या रक्कमेमध्ये सर्वाधिक पाचशे रुपयांच्या नोटा आहेत..
केंद्रीय तपास संस्थेने मे 2023 मध्ये झारखंडच्या मुख्य सचिवांना ईडीने लिहिलेले अधिकृत पत्र देखील जप्त केले, ज्यामध्ये कंत्राटदारांकडून घेतलेल्या कथित लाचेच्या खुलाशाचा स्वतंत्र तपास आणि एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाबाबत आलमगीर आलम म्हणाले की, मला अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
ईडीने काय केला आहे आरोप?
केंद्रीय तपास यंत्रणेने गेल्या वर्षी एक निवेदन जारी केले होते की, "रांची येथील ग्रामीण बांधकाम विभागात मुख्य अभियंता म्हणून तैनात असलेल्या वीरेंद्र कुमार राम यांनी कंत्राटदारांना निविदा वाटपाच्या बदल्यात लाचेच्या नावावर अवैध उत्पन्न मिळवले होते." ईडीने आरोप केला होता की, "गुन्हेगारीतून मिळालेली कमाई वीरेंद्र कुमार राम आणि त्यांच्या कुटुंबियांनी आलिशान जीवनशैली जगण्यासाठी वापरली आहे."