कोलकाता - देशभरातील अनेक राज्याती अंमलबजावणी संचालनालयाकडून छापेमारी सुरू आहे. त्यावरुन, विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला आहे. नुकतेच, ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोतला समन्स पाठवले. याशिवाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या संपत्तीवरही छापेमारी केली आहे. त्यानंतर, आता ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या विरोधातही ईडीने कारवाई केली आहे. ईडीने रेशन घोटाळाप्रकरणी मलिक यांना अटक केली आहे.
ज्योतिप्रिय मलिक हे माजी खाद्य मंत्री असून सध्याच्या ममता सरकारमध्ये वनमंत्री आहेत. ईडीने गुरुवारी दिवसभर त्यांची चौकशी केली. त्यानंतर, पहाटेच्या सुमारास त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. शुक्रवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास ईडीने अटक केली. मलिक यांच्या अटकेपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकावर निशाणा साधला होता. तसेच, ईडीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, ईडीने मलिक यांना अटक केली आहे. तत्पूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक भागात वनमंत्री मलिक यांच्या दोन फ्लॅटवर छापा टाकला होता. तसेच, मलिक यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. मलिक हे खाद्यमंत्री असताना मोठा धान्य घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
दरम्यान, ईडीने मलिक यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जोका येथील ईएसआयच्या रुग्णालयात नेले आहे.
ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारविरुद्ध संताप
पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या ठिकाणांवरील ईडीच्या छापेमारीसंदर्भात, ममता बॅनर्जींनी ईडीवर गुन्हा दाखल करण्याचीही धमकी दिली आहे. त्या म्हणाल्या, ज्योतिप्रिय यांची प्रकृती बरी नाही. ईडीच्या छापेमारीदरम्यान त्यांना काही झाले, तर मी गुन्हा दाखल करेन. एवढेच नाही, भाजपला 'सबका साथ सबका विकास' हवा आहे असे म्हणतात, पण प्रत्यक्षात याचा अर्थ 'सबका साथ सबका विनाश' असा आहे, असेही ममता यांनी म्हटलं होतं.