पंजाबमधील जालंधरमध्ये ईडीने काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री साधू सिंग धर्मसोत आणि त्यांच्या मुलावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने माजी मंत्री आणि त्यांच्या मुलाची 4.58 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (PMLA) तरतुदीनुसार ईडीने ही कारवाई केली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात काँग्रेस नेते साधू सिंग धर्मसोत कॅबिनेट मंत्री होते. ईडी धर्मसोत यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. साधू सिंग धर्मसोत हे पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या काळात 1 मार्च 2016 ते 31 मार्च 2022 या कालावधीत पंजाबचे वनमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) ईडीच्या तपासादरम्यान, माजी मंत्री धर्मसोत यांनी जास्त मालमत्ता मिळवल्याचे आढळून आले. या प्रकरणावर ईडीने सांगितलं की, माजी मंत्री आणि त्यांच्या मुलांचं उत्पन्न नमूद केलेल्या स्त्रोतांशी जुळत नाही. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
या वर्षी 15 जानेवारीला ईडीने पंजाबचे माजी मंत्री साधू सिंग धर्मसोत यांना अटक केली होती. धर्मसोत यांना ईडीच्या जालंधर युनिटने वन घोटाळा आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर ईडीने त्यांना अटक केली होती.