काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता दिनो मोरया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती सक्तवसूली संचलनालयानं जप्त केली आहे. गुजरात स्थित स्टर्लिंग बायोटेक समुहाशी निगडीत एका घोटाळ्याप्रकरणी ईडीद्वारे ही कारवाई करण्यात आली. गुजरातमधील व्यावसायीक संदेसारा बंधुंच्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याच्या एका प्रकरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
पीएमएलए कायद्याअंतर्गत चार लोकांची संपत्ती जप्त करण्याचे सुरूवातीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सक्तवसूली संचलनालयानं दिली आहे. या संपत्तीची एकूण किंमत ८.७९ कोटी रूपये इतकी आहे. यामध्ये खान याच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत तीन कोटी रूपये आहे. तर दिनो मोरयाच्या संपत्तीची किंमत १.४ कोटी रूपये आणि डीजे अकील म्हणजेच अब्दुलखलील बचुअलीच्या संपत्तीची किंमत १.९८ कोटी रूपये इतकी आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी याच्या संपत्तीची किंमत २.४१ कोटी रुपये इतकी आहे.