नवी दिल्ली : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे तथा तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. अभिषेक यांना ६ सप्टेंबर रोजी, तर रुजिरा यांना त्याआधीच १ सप्टेंबर रोजी बँक खात्यांच्या तपशीलासह ईडीसमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. आणखी तीन जणांना चौकशीचे समन्स बजावण्यात आले.
अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांच्यावर कथित कोळसा घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. कोळसा घोटाळ्यात सहभागी असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एका कंपनीत अभिषेक यांचे वडील अमित बॅनर्जी हे संचालक आहेत. कोळसा घोटाळ्याचा तपास सीबीआय करीत आहे. गेल्या वर्षी २७ नोव्हेंबर रोजी सीबीआयच्या कोलकता लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने ईस्टर्न कोलफिल्डच्या अखत्यारीतील कार्यक्षेत्रात अवैध खाणकाम केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता.
ईडीने कोणाला कधी बोलावले?
- ईडीने एकूण ५ जणांना समन्स बजावले असून त्यांना पुढील तारखांना ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे.
- १ सप्टेंबर - रुजीरा बनर्जी
- ३ सप्टेंबर - संजय बसु
- ६ सप्टेंबर - अभिषेक बनर्जी
- ८ सप्टेंबर - श्याम सिंह (डीआयजी मिदनापुर रेंज)
- ९ सप्टेंबर - ज्ञानवंत सिंह (एडीजी सीआयडी)