नवी दिल्ली : पुराणांतील बोधकथा आकर्षक चित्रांसह घराघरांत पोहोचवून तीन पिढ्यांवर नीतीमूल्यांचे संस्कार घडविणाऱ्या ‘चांदोबा’ व ‘चंदामामा’ यासह १४ भाषांमधील मासिकांच्या मालकांनी काळा पैसा स्विस बँकांमध्ये दडविल्याचा संशय असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याचा तपास सुरु केला.‘चंदामामा’व ‘चांदोबा’सह या मासिकांची साखळी प्रसिद्ध करण्याचे हक्क सन २००७ मध्ये मुंबईतील जिएडेसिक लि. या कंपनीने घेतले. ही कंपनी आणि प्रशांत शरद मुळेकर, पंकजकुमार ओंकार श्रीवास्तव आणि किरण कुलकर्णी या त्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध ‘ईडी’ने ‘मनी लाँड्रिंग’ व अन्य वित्तीय अनियमिततांच्या संदर्भात औपचारिक गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.या कंपनीचे व संचालकांचे पैसे स्विस बँकांमध्ये असल्याचे कळल्यानंतर त्याचा तपशील मिळविण्यासाठी ‘ईडी’ने स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँक नियामक प्राधिकरणाकडे अर्ज केला. नियामक प्राधिकरणाने माहिती देण्याची तयारी दर्शविणारे पत्र ५ मार्च रोची पाठविले आहे. कंपनी व संचालकांनी येत्या ६० दिवसांत यास आक्षेप घेऊन स्विस न्यायालयाकडून मनाई आणली नाही तर नियमानुसार कंपनी व तीन संचालकांच्या खात्यांमधील पैशांची माहिती स्विस बँका देऊ शकतील.
‘चांदोबा’च्या मालकांनी स्विस बँकांत पैसा दडवल्याचा ईडीला दाट संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 6:15 AM