नवी दिल्ली - केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यासह देशभरातील अनेक नेतेमंडळींवर कारवाया सुरू आहेत. शुक्रवारी साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रिफ यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणी शुक्रवारी ईडीचे अधिकारी पोहोचले होते. सध्या ईडी आणि सीबीआयच्या कारवाया सोशल मीडियाच्या माध्यमातून गल्लापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे, विरोधकांकडून सत्ताधारी मोदी सरकारवर थेट आरोप करत आहेत. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे आता काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी म्हटलंय.
कपिल सिब्बल यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलंय. त्याच अनुषंगाने एका मुलाखतीत त्यांनी ईडी आणि सीबीआयवरही ताशेरे ओढले.
जेव्हा सर्वच राजकीय पक्ष अन्यायाविरुद्ध एकत्रितपणे लढतील तेव्हाच माझा प्लॅटफॉर्म यशस्वी होईल. बंगालमध्ये ममता, महाराष्ट्रात उद्धव, केरळमध्ये सीपीएम, बिहारमध्ये तेजस्वी, युपीमध्ये अखिलेश, झारखंडमध्ये हेमंत सोरेन आणि काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला यांच्याविरुद्ध केंद्र सरकारकडून अन्याय होत आहे. त्यामुळे, न्याय मिळवण्यासाठीच्या मुद्दयाने हे सर्वचजण एकत्र आले तर, आम्हाला यश मिळेल, असे काँग्रेस नेते आणि ठाकरे गटाचे सर्वोच्च न्यायालयातील वकिल कपिल सिब्बल यांनी म्हटलंय.
सिब्बल यांना ईडी आणि सीबीआयकडून होत असलेल्या कारवायांसदर्भात प्रश्न विचारला होता. तसेच, अशा कारवाया काँग्रेस सरकारच्या काळातही होत होत्या, असेही पत्रकाराने विचारले. त्यावर, कपिल सिब्बल यांनी उत्तर दिले. ईडीने भारताचा नकाशाच बदलून टाकलाय. ज्या राज्यात भाजपचं सरकार आहे, तिथपर्यंत ईडीचा रस्ता पोहोचत नाही. पण, जेथ विरोधी पक्षातील नेते आहेत, तिथल्या गल्ली बोळातही ईडीचे अधिककारी पोहोचत आहेत. हे सगळं भाजपच्या ईशाऱ्यावरच होत आहे. भाजपला वाटतंय, निवडणूक आल्या आहेत. आता, सिसोदियाला तुरुंगात टाका, शिबू सोरेन यांच्याविरुद्ध लोकपालची नोटीस द्यावी, लालूप्रसाद यादव यांची चौकशी सुरू झालीय. त्यामुळेच, सध्या केंद्रीय तपास यंत्रणा ह्या राजकीय बनल्या आहेत, असेही कपिल सिब्बल यांनी दै. भास्करला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.