नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. पीएमएलए कायद्यातंर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सक्तवसुली संचालनालयाकडून करण्यात आलेल्या नवीन आरोपपत्रात पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपींविरोधात भक्कम पुरावे व आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे तपशील आणि अन्य काही बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नीरव मोदी लंडनच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर सक्तवसुली संचालनालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 'द टेलिग्राफ' वृत्तपत्राने नीरव मोदीचा हा व्हिडिओ शेअर केला होता. ईडीकडे आणखी पुरावे आल्यामुळे आम्ही पुरवणी आरोपपत्र दाखल केले असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्यात यावे अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटन, अमेरिका, इजिप्त या देशांना केली आहे. ब्रिटनमधील गृहमंत्रालयाने ही विनंती स्थानिक न्यायालयाकडे पाठवली आहे. नीरव मोदी लंडनमधील वेस्ट एंड भागातील आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहे. त्याला व्यवसाय करण्याकरिता ब्रिटन सरकारने राष्ट्रीय विमा क्रमांकही दिला आहे.