लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दोन तास १५ मिनिटे चौकशी केली. त्यांना आता येत्या सोमवारी, २५ जुलै रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
कोरोनातून बऱ्या झालेल्या सोनिया गांधी चौकशीवेळी ईडी मुख्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तपासादरम्यान ईडीकडे फारसे प्रश्नच नव्हते त्यामुळे त्यांना लवकर जाण्यास सांगितल्याची माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली.
सोनिया गांधी यांनी आपण कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत. ८ ते ९ वाजेपर्यंत थांबण्यासही तयार आहोत. काही प्रश्न असतील तर विचारा, अशीही विनंती केली होते. मात्र, ईडी अधिकाऱ्यांकडे प्रश्नच नव्हते, असेही रमेश यांनी टि्वट केले आहे.
देशभरात निदर्शने
ईडीकडून सोनिया गांधी यांच्या होत असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने देशभरात जोरदार निदर्शने करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विरोधी पक्षांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी निदर्शने करताना स्वत:ला अटक करून घेतली.