नवी दिल्ली: कॅनडा सीमेवरून भारतीयांच्या अमेरिकेत तस्करीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काही कॅनेडियन महाविद्यालये आणि काही भारतीय संस्थांच्या कथित सहभागाची सक्तवसुली संचालनालय 'ईडी' चौकशी करत आहे. ही चौकशी गुजरातमधील डिंगुचा गावातील चारजणांच्या भारतीय कुटुंबाच्या मृत्यूशी संबंधित आहे. १९ जानेवारी २०२२ रोजी कॅनडा-अमेरिका सीमा बेकायदा ओलांडण्याचा प्रयत्न करताना या चौघांचा अतिथंडीमुळे मृत्यू झाला होता.
अहमदाबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित भावेश अशोकभाई पटेल आणि इतर काही व्यक्तींच्या विरोधात मनी लॉन्डरिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पटेल आणि इतर आरोपींवर कॅनडाद्वारे अमेरिकेमध्ये लोकांना अवैध मार्गाने पाठवण्यासाठी एक योजनाबद्ध कट रचल्याचा आरोप आहे. या रॅकेटचा भाग म्हणून, आरोपींनी अवैधपणे अमेरिकेला जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी कॅनडातील कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये प्रवेशाची व्यवस्था केली होती.
कॅनडामधील २६२ महाविद्यालयांचे भारतात करार
या संदर्भात ईडीने १० आणि १९ डिसेंबर रोजी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथील आठ ठिकाणी तपास केला. मुंबई आणि नागपूर येथील दोन 'संस्थांनी' परदेशातील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी 'करार' केले आहेत. कॅनडामधील सुमारे २६२ महाविद्यालयांनी भारतीय संस्थांशी करार केले आहेत. या संस्थांचा मानवी तस्करीत सहभाग असल्याची ईडीला शंका असल्याने त्याची चौकशी सुरु आहे, असेही ईडीने म्हटले आहे.
मुंबई आणि नागपूरमधील दोन संस्थाही समोर आल्या असून, ज्या परदेशी विश्वविद्यालयांसोबत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कमिशनच्या आधारावर करार करत होत्या.
एक संस्था दरवर्षी सुमारे २५,००० विद्यार्थ्यांना परदेशी कॉलेजमध्ये २ पाठवते. तर दुसरी संस्था १०,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पाठवते. १,७०० एजंट गुजरातमध्ये आणि ३,५०० इतर राज्यांमध्ये सक्रिय आहेत, ज्यात ८०० अजूनही काम करत आहेत.
ईडीने १९ लाख रुपये रक्कमेच्या बँक ठेवी फ्रीज केल्या असून, २ वाहन जप्त केली आहेत. कागदपत्रे व डिजिटल डिव्हाइसही जप्त केली आहेत.
प्रत्येकी ५५ ते ६० लाख रुपये घेत होते
कॅनेडियन विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज केला गेला आणि एकदा त्या व्यक्तींनी कॅनडामध्ये प्रवेश केला की, त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश न घेता यूएस-कॅनडा सीमा ओलांडली, असे ईडीने सांगितले. या रॅकेटमध्ये भारतीयांकडून प्रत्येकी ५५ ते ६० लाख रुपये आकारले जात होते.