नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीत आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार आणि राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणात छापे टाकत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार आणि आम आदमी पार्टीशी संबंधित इतर लोकांच्या जागेवर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने धाड टाकली आहे. दिल्लीत सुमारे १० ठिकाणी छापे टाकण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार आणि दिल्ली जल बोर्डाचे माजी सदस्य शलभ कुमार यांच्याशिवाय इतर काही नेत्यांच्या ठिकाणांवर ईडीकडून धाड टाकण्यात येत आहेत.
कोणत्या प्रकरणात ईडी छापे टाकत आहे?
ईडी दिल्ली जल बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करत आहे. सीबीआय आणि दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या (एसीबी) एफआयआरच्या आधारे ईडी कारवाई करत आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटरचा पुरवठा, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंगसाठी निविदा काढताना दिल्ली जल बोर्डाच्या अधिका-यांनी कंपनीला अनुकूलता दिल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
काय होते आरोप?
कंपनीने तांत्रिक पात्रतेचे निकष पूर्ण केले नसतानाही आणि बनावट कागदपत्रे सादर करून निविदा मिळवल्या असतानाही कंपनीला ३८ कोटी रुपयांचे बेकायदेशीर कंत्राट देण्यात आले होते.