बंगळुरु : कर्नाटक काँग्रेसचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांच्यावरच संकट ओढावले आहे. त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले असून चौकशीसाठी बोलविले आहे. त्यामुळे डी. के. शिवकुमार आज दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे.
डी. के. शिवकुमार यांना 2018 मध्ये ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी ईडीने काढलेली नोटीर रद्द करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयायात धाव घेत अर्ज दाखल होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना आज ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, याविषयी बोलताना डी.के. शिवकुमार यांनी मागील दोन वर्षात माझ्या आईच्या नावे असणारी संपत्ती वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी बेनामी असल्याचे सांगत जप्त केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, 2017 मध्ये डी. के शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्लीतील निवासस्थानांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. या छाप्यात 8 कोटी 59 लाखांची बेकायदा रक्कम आढळून आली होती. याप्रकरणातील चौकशीदरम्यान डी. के शिवकुमार यांनी खोटी माहिती दिली, असा आरोप करून ईडीने त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याचबरोबर, डी. के शिवकुमार यांनी हलावा एजंटमार्फत कोट्यवधी रुपये बदलून घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी समन्स बजावले होते. ही समन्स रद्द करण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.