लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ९३०० कोटींहून अधिक रुपयांच्या उलाढालीत परकीय चलनविषयक फेमा कायद्याचा बायजू या ऑनलाइन शिक्षणविषयक प्लॅटफॉर्मने भंग केल्याचा दावा करून ईडीने या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. बायजूचे सीईओ व सहसंस्थापक रवींद्रन बायजू यांना ही नोटीस बजावली.
मात्र, ईडीने केलेल्या दाव्याचा बायजू कंपनीने इन्कार केला आहे. या कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला ईडीकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे त्यासंदर्भातील वृत्तांमध्ये काही तथ्य नाही असे बायजूने म्हटले आहे. रवींद्रन बायजू यांच्याशी संबंधित बंगळुरू येथील तीन ठिकाणांवर गेल्या एप्रिल महिन्यात ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी काही आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल स्वरूपातील महत्त्वाची माहिती ताब्यात घेतल्याचा दावा ईडीने केला होता. ९३६२.३५ कोटी रुपयांच्या व्यवहारात फेमा कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरूनच ही कारवाई करण्यात आली होती.
कर्जफेडीसाठी बायजूची धडपड सुरूबायजू या कंपनीने २ ते ४ हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा प्रयत्न चालविला होता. या कंपनीवर सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. ते फेडण्यासाठी बायजूकडून प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला कोणतीही कारणे दाखवा नोटीस मिळालेली नाही या बायजूच्या दाव्यावर ईडीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. ऑनलाइन शिक्षणात बायजूने गेल्या काही वर्षांत महत्त्वाचे स्थान मिळविले आहे.