अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर छापेमारीदरम्यान राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या समर्थकांनी हल्ला केल्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. ज्यावेळी ईडीच्या टीमवर हल्ला करण्यात आला आणि त्यांना लक्ष्य करण्यात आले, त्यावेळी ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफचे फक्त 27 जवान होते. या हल्ल्यात तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यादरम्यान जमावाने त्यांचा मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि पाकीट हिसकावून घेतले. बंगाल पोलिसांनी या प्रकरणी तीन एफआयआर नोंदवले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर एकीकडे विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असतानाच दुसरीकडे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनीही सर्व घटनात्मक पर्यायांचा विचार करून योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, "ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हे योग्य प्रकरण आहे. पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे". तर भाजपाने उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखली येथील घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जी यांची किम जोंगशी तुलना केली.
दरम्यान, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना भडकावल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. यानंतर शाहजहान यांच्या समर्थकांकडून हल्ले झाले तेव्हा ही घटना घडली. समर्थकांनी अधिकारी आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. शाहजहान हे राज्यमंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांचे निकटवर्तीय मानले जातात. कोट्यवधी रुपयांच्या रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी ज्योतिप्रिया मल्लिक यांना अटक करण्यात आली आहे.