चंडीगड : ईडीने आपचे आमदार जसवंत सिंह गज्जनमाजरा यांना मनी लाँड्रिंग व ४०.९२ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात सोमवारी ताब्यात घेतले. गज्जनमाजरा हे मलेरकोटला जिल्ह्यातील अमरगढ भागातील आमदार आहेत.ईडीने त्यांना ताब्यात घेतले तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत होते. गेल्या एक वर्षापासून मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी त्यांच्याविरोधात चौकशी करत आहे. याआधी गज्जनमाजरा यांना चारवेळा ईडीने समन्स बजावले आहेत.
आपने म्हटले की, भाजप सुडाचे राजकारण करत आहे. आमदार आणि नेत्यांना धमकावण्याचा हा प्रयत्न आहे. गज्जनमाजरा यांनी सांगितले होते की, आमदाराचे वेतन म्हणून केवळ १ रुपया घेऊ. त्यावेळी ते चर्चेत आले होते. गेल्यावर्षीही ईडीच्या पथकाने गज्जनमाजरा यांच्या घरावर आणि अमरगढमधील त्यांच्या कुटुंबीयांकडून चालवल्या जाणाऱ्या शाळा आणि पशुखाद्य कारखान्यावर छापा टाकला होता.