एस. पी. सिन्हा -
रांची (झारखंड) : दसऱ्याचा उत्साह असतानाच रांचीमध्ये शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनेक ठिकाणी छापे मारले. एका जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाॅण्ड्रिंगचा गुन्हा दाबण्याच्या नावाखाली कोट्यवधींची वसुली करण्यात येत असल्याची माहिती कळाल्यानंतर ईडीने कारवाई केली, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
रांचीतील प्रदीप गुप्तानामक व्यक्तीच्या निवासस्थानी ईडीने तपासणी केली. याप्रकरणातील एक आरोपी वकील सुजित कुमार याच्या जवळच्या लोकांशी संबंधित ठिकाणांवरही छापे मारले जात आहेत.
याआधी ८ ऑक्टोबर रोजी रांचीसह धनबाद व पाटण्यात छापे मारण्यात आले होते. जिल्हा परिवहन अधिकारी सीपी दिवाकर द्विवेदी, सुजित कुमार, क्षेत्रीय अधिकारी जय कुमार राम, नामकुमचे अधिकारी प्रभात भूषण आणि संजीव पांडेय यांच्या ठिकाणांवर छापे मारण्यात आले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेल्या जमीन घोटाळ्यात ईडीने कमलेशकुमाला अटक केली होती. यात ईडीला ‘मॅनेज’ करण्याच्या बहाण्याने कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार होत असल्याची माहिती ईडीला मिळाली होती.