दिल्ली, मेरठ, नोएडा आणि चंदीगडसह देशातील अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी गुरुवारी सकाळपासून सुरू आहे. छाप्यादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी रिटायर्ड आयएएस अधिकारी आणि नोएडा प्राधिकरणाचे माजी सीईओ यांच्या घरातून हिरे, सोनं, रोख रक्कम आणि कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रं जप्त केली आहेत. यामध्ये पाच कोटींच्या हिऱ्याचाही समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने लोटस ३०० हाऊसिंग प्रोजेक्टवर ही कारवाई केली आहे. ईडीने रिटायर्ड आयएएस आणि नोएडा प्राधिकरणाचे माजी सीईओ मोहिंदर सिंग यांच्या चंदीगड येथील निवासस्थानावर छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल एक कोटी रुपये रोख, १२ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, ७ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.
ईडीने ज्या प्रकरणात कारवाई केली आहे तो ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. माजी मुख्यमंत्री मायावती सरकारच्या काळात झालेल्या ९००० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याशीही ते जोडलेले आहेत. त्यावेळी जमीन वाटप हे अधिकारी आणि राजकारण्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी केलं होतं.
रिटायर्ड आयएएस मोहिंदर सिंग यांच्यावर आम्रपाली आणि सुपरटेकसह अनेक मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांना मदत केल्याचा आरोप आहे. विकासकांनी कवडीमोल भावाने जमीन खरेदी केल्याने राज्याच्या तिजोरीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप आहे. CAG ने म्हटलं आहे की नोएडा प्राधिकरणाने २००५ ते २०१८ दरम्यान मोठ्या प्रमाणात फसवणूक केली, ज्यामुळे सरकारचे हजारो कोटींचे नुकसान झाले.