नवी दिल्ली : खत घोटाळ्याशी संबंधित मनी लॉड्रिंगप्रकरणी देशभरातील धाडसत्रात बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या थोरल्या बंधूच्या जोधपूर जिल्ह्यातील मंदोर परिसरातील शेतवाडी आणि घरावर छापे टाकले.या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान होते. सीआरपीएफचे जवान गेहलोत यांच्या मंदोरस्थित शेतवाडी (फार्महाऊस) आणि घरांवर तैनात असल्याचे दिसले.
मुख्यमंत्री गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात राजकीय संघर्ष चालू असताना ईडीने ही धाड टाकली. अशोक गेहलोत यांचे थोरले बंधू अग्रसेन गेहलोत यांच्या घरावर धाडी घालण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्रसेन गेहलोत हे अनुपम कृषी या बी-बियाणे आणि खत कंपनीचे प्रवर्तक आहेत. ईडीने राजस्थानात काँग्रेसच्या माजी खासदाराच्या परिसरासह सहा ठिकाणी धाडी घातल्या. प. बंगाल, गुजरात, दिल्लीसह १३ ठिकाणी धाडसत्र चालू आहे. या धाडीमागाचा उद्देश ६० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पुरावे गोळा करणे आहे.
‘रेड राज’ला घाबणार नाही
ईडीच्या धाडीबाबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला जोधपूरमध्ये म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘रेड राज’ आणले आहे; परंतु आम्ही घाबरणार नाही. राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यात केंद्राचा डाव बसल्याने ईडीचे धाडसत्र सुरू करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.