नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित असणा-या संपत्तीवर अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईमधील ठिकाणावंर आज सकाळी हे छापे टाकण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हे छापे एअरसेल-मॅक्सीस प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या संबंधातील आहेत. 1 डिसेंबर रोजीसुद्धा अशाच प्रकारचा तपास करण्यात आला होता.
मनी लाँड्रिंग प्रकरणी गैरहजर राहिल्याने गुरुवारी ईडीने कार्ती चिदंबरमविरोधात समन्स जारी केला होता. आता त्यांना 16 जानेवारीला हजर राहण्याचा आदेश देण्यता आला आहे. याआधी त्यांना गुरुवारी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र ते गैरहजर राहिले.
काय आहे प्रकरणसीबीआयकडून विशेष कोर्टात दाखल असलेल्या चार्जशीटनुसार, मॅक्सिसची सहाय्यक कंपनी ग्लोबल कम्युनिकेशन सर्व्हिसेज होल्डिंग्ज लिमिटेडने एअरसेलमध्ये 800 मिलियन डॉलरच्या गुंतवणुकीसाठी मंजुरीची मागणी केली होती. आर्थिक प्रकरणात कॅबिनेट कमिटी या प्रकरणात परवानगी देण्यास सक्षम आहे. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यासाठी अनुमोदनही दिलं होतं. या प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तसेच पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता.
सीबीआयने 4 ऑगस्ट रोजी कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. नोटीसमधून देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर कार्ती चिंदबरम यांनी सीबीआयच्या नोटीसला विरोध करत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही नोटीस रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने 10 ऑगस्ट रोजी गरज नसल्याचं सांगत लूकआऊट नोटीसला स्थगिती दिली होती.
एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं कार्ती चिदंबरम यांची 1.16 कोटींची संपत्ती जप्त केली असून, बँक अकाऊंट आणि एफडीही गोठवली आहेत. विशेष म्हणजे 90 लाख रुपयांची एफडी कार्ती चिदंबरम यांची बँकेत जमा आहे.