आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापा मारला असून, दिल्लीस्थित त्यांच्या निवासस्थानी तपासणी सुरू आहे. दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी तपासासाठी ईडीचं पथक सकाळी ७ वाजता संजय सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचलं. या पथकानं शोधमोहीम सुरू केली आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तीन ठिकाणी संजय सिंह यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र आतापर्यंत ईडीकडून याबाबती कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच हे छापे कोणत्या प्रकरणात मारण्यात आले, याबाबतही ईडीकडून कुठलंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे मद्य धोरण घोटळ्या प्रकरणी तुरुंगात आहेत. मनीष सिसोदिया यांना यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मद्य घोटाळ्यामध्ये मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेल्या ई़डीने त्यांना अटक केली होती. तेव्हापासून सिसोदिया तुरुंगात बंद आहेत.