आम आदमी पक्षाच्या आणखी एका आमदारावर ईडी कारवाई करू शकते. केंद्रीय एजन्सीचे एक पथक छापा टाकण्यासाठी आमदार गुलाब सिंह यांच्या घरी पोहोचले असल्याचा दावा पक्षाने शनिवारी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर एजन्सी आमदाराच्या घरावर छापे टाकत आहे.
आपचे आमदार गुलाब सिंह यादव यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्याबाबत दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "फक्त भारतातच नाही तर जगभरातील लोकांना कळलं आहे की, भाजपा सरकार सर्व विरोधकांना जेलमध्ये टाकण्यात व्यस्त आहे. भारत रशियाच्या मार्गावर आहे... हे बांगलादेश, पाकिस्तान, उत्तर कोरियामध्ये दिसून आले आहे आणि आता भारतही त्याच मार्गावर आहे."
"जगातील सर्वात मोठी लोकशाही आता हुकूमशाहीच्या मार्गावर आहे, जिथे लोकांचे मूलभूत अधिकार नष्ट केले जातील, जिथे विरोधकांना रोखले जाईल... आमचे 4 मोठे नेते खोट्या खटल्यांमध्ये जेलमध्ये आहेत. गुजरातमध्ये निवडणूक लढवत आहोत आणि पक्षाचे गुजरात प्रभारी गुलाब सिंह यादव यांच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत. आगामी काळात 'आप'चे नेते आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर छापे टाकले जातील, जेणेकरून विरोधक घाबरतील आणि गप्प बसतील" असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.
"अरविंद केजरीवाल तेच करतील जे लोक म्हणतील. त्यांनी नेहमीच लोकांच्या म्हणण्यानुसार मोठे निर्णय घेतले आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या सर्व आमदारांशी संपर्क साधला, त्यांच्याशी चर्चा केली, बैठका घेतल्या, नगरसेवकांची भेट घेतली. आम्ही सर्व वॉर्डातील लोकांशी बोललो. अरविंद केजरीवाल हेच मुख्यमंत्री राहतील असं सर्वांनी सांगितलं" असं देखील आप नेत्यांनी म्हटलं आहे.