मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या नीरव मोदीच्या संपत्तीवर छापे टाकण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी नीरव मोदीच्या आणखी काही मालमत्तांवर छापे टाकले. यावेळी नीरव मोदीच्या मालकीची 176 स्टीलच्या तिजोऱ्या आणि महागडी परदेशी घड्याळे असलेले प्लॅस्टिकचे 60 कंटनेर जप्त करण्यात आले. याशिवाय, ईडीकडून नीरव मोदीची काही बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. या बँक खात्यांमध्ये तब्बल 30 कोटी रूपये आहेत. तसेच नीरव मोदीच्या कंपनीच्या मालकीचे 13.86 कोटी रूपयांचे शेअर्सही जप्त करण्यात आल्याचे समजते.तत्पूर्वी गुरुवारी 'ईडी'ने नीरव मोदीच्या 9 अलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. या गाड्यांमध्ये एक रोल्ज रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज बेंझ जीएल ३५० सीडीआयएस, एक पोर्शे पनामेरा, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्युनर आणि एका टोयोटा इनोव्हा गाडीचा समावेश आहे. जप्त केलेल्या नऊ कारची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यातील रोल्ज रॉयस कारची किंमत सुमारे ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी सीबीआयने नीरव मोदीच्या अलिबागमधील अलिशान फार्म हाऊसलाही टाळे ठोकले होते.