नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीने मनी लॉंड्रिंगप्रकरणी (Money Laundering) कारवाई केली आहे. मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी केलेल्या छापेमारीत कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. मनी लॉंड्रिंगप्रकरणात ईडीने सत्येंद्र जैन यांना अटक केली असून, सीबीआयनेही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ईडीने सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान २.८२ कोटी रुपये रोख आणि १३३ सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत. सत्येंद्र जैन, पूनम जैन आणि त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने मदत सहकाऱ्यांवर शोधमोहीम राबवण्यात आली. यामध्ये अंकुश जैन, वैभव जैन, नवीन जैन आणि सिद्धार्थ जैन योगेश कुमार जैन यांचा समावेश आहे.
काँग्रेसचा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात करण्यात आलेल्या बड्या कारवाईनंतर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. या एकूणच प्रकारावरून हे सिद्ध होते की, अरविंद केजरीवाल ‘आम’ नाही, बेईमान ‘आदमी’ आहेत. तत्पूर्वी, सत्येंद्र जैन चार कंपन्यांचे भागधारक असून, त्यांना मिळालेल्या निधीचे स्रोत ते उघड करू शकले नाहीत.
गेल्या महिन्यात, ईडीने या कंपन्यांच्या ४.८१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या होत्या. सत्येंद्र जैन यांच्यावर दिल्लीत अनेक बनावट कंपन्या खरेदी केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्यावर कोलकाता येथील तीन हवाला ऑपरेटर्सच्या ५४ बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १६.३९ कोटी रुपयांचा काळा पैसा उपयोगात केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर ते मंत्रिपदावर कायम राहण्याबाबत प्रश्न उपस्थित करत स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच, काळ्या पैशाचे मालक सत्येंद्र जैन यांना केजरीवाल का वाचवत आहेत? असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.