ED Raid Updates : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी एका व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकली. स्वप्न साहा असे या व्यावसायिकाचे नाव असून, त्याच्या घरात पोलिसांना ९ किलोपेक्षा जास्त सोने सापडले आहे. पोलिसांनी सोने आणि रोख रक्कमही जप्त केली आहे.
कोलकातामधील बीई ब्लॉक येथे असलेल्या घरावर ईडीने धाड टाकली होती. सोने, रोख रक्कम आणि संपत्तीची कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांना घरात आढळून आली. हे सर्व अधिकाऱ्यांनी जप्त केले असून, याची चौकशी केली जाणार आहे. एका बँक घोटाळा प्रकरणात ईडीने ही धाड टकाली होती.
बँक घोटाळा प्रकरणाशी संबंध
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची झाडाझडती घेत असताना स्वप्न साहाच्या घरात ९ किलोपेक्षा जास्त सोने सापडले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळपास ६ कोटी ५३ लाख इतकी आहे. त्याचबरोबर घरात काही रोख रक्कम सापडली आहे. काही संपत्तीची कागदपत्रेही आढळून आली असून, हे सगळे बँक घोटाळ्याशी संबंधित असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे.
असमाधानकर उत्तरे अन् ईडी अधिकाऱ्यांनी जप्त केले सोने
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वप्न साहा यांची संपत्तीची कागदपत्रे, सोन्याबद्दल चौकशी करण्यात आली. त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नव्हती, त्यामुळे सोने, पैसे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली. स्वप्न साहा आणि अन्य संशयितांविरोधात ईडी सध्या तपास करत आहे.
स्वप्न साहाच्या घरात इतकं सोनं कोठून आले आणि याचा बँक घोटाळ्याशी संबंध आहे का? या अनुषंगाने ईडी आता तपास करत आहेत. ईडीने टाकलेली धाड आणि जप्त केलेल्या सोन्यामुळे कोलकातामध्ये खळबळ उडाली आहे.