नवी दिल्ली : अलाहाबाद बँकेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका माध्यम समूहाची १२७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.ईडीने अधिकृतरीत्या जारी केलेल्या निवेदनात मंगळवारी ही माहिती दिली. ईडीने म्हटले आहे की, पिक्सन मीडिया प्रा. लि. या माध्यम समूहाशी संबंधित हे प्रकरण आहे. या समूहात पर्ल मीडिया प्रा. लि., महुआ मीडिया प्रा. लि., पिक्सन व्हिजन प्रा. लि., पर्ल स्टुडिओ प्रा. लि., पर्ल व्हिजन प्रा. लि., सेंच्युरी कम्युनिकेशन लि. या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे संचालक पी. के. तिवारी, आनंद तिवारी, अभिषेक तिवारी आणि इतर काही जण आरोपी आहेत.निवेदनात म्हटले आहे की, समूहातील कंपन्या आणि संचालक यांच्या मालकीच्या १२७.७४ कोटी रुपयांच्या मालत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये करण्यात आलेल्या या कारवाई मुंबई, चेन्नई, नोएडा आणि कोलकता येथील ११ व्यावसायिक भूखंड आणि इमारतींचा समावेश आहे. आरोपींनी विविध बँकांकडून तब्बल २,६०० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. हा पैसा ज्या कारणांसाठी उचलण्यात आला त्यासाठी वापरण्यात आला नाही. बँक खाती आणि कंपन्यांच्या माध्यमातून हा पैसा फिरविण्यात आला. मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्याचा वापर केला.गुंतागुंतीचे व्यवहारमनी लाँड्रिंगचे पितळ उघड होऊ नये, यासाठी आरोपींनी बँक खात्यांवरील आर्थिक व्यवहार अत्यंत गुंतागुंतीचे करून ठेवले होते. पैसा वारंवार ठराविक खात्यांत फिरविण्यात आला. कंपनीच्या प्रवर्तकांविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध सीबीआयने आधीच गुन्ह्याची नोंद केली आहे.
ईडीकडून माध्यम कंपनीची १२७ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 4:16 AM