दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण प्रकरण आता तेलंगानापर्यंत पोहोचले आहे. केसीआर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी आता ईडीने तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के.के.सविता यांना समन्स पाठवले आहे. कविता यांना गुरुवारी म्हणजेच ९ मार्च रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सीबीआयने गेल्या काही दिवसापूर्वी आम आदमीचे नेते दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी रोजी याच प्रकरणात अटक केली होती. सध्या मनीष सिसोदिया २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.
यापूर्वी सीबीआयने डिसेंबर महिन्यात या प्रकरणी के कविता यांची चौकशी केली होती. हैदराबादचे व्यापारी अरुण रामचंद्र पिल्लई यांना या प्रकरणी एक दिवस आधी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने पिल्लईला १३ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याशिवाय मद्यसम्राट अमनदीप ढाल याला २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
के कविता यांनी १० मार्च रोजी दिल्लीत एक दिवसीय उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती. महिला आरक्षण विधेयक संसदेत आणण्याच्या उद्देशाने हा संप करण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी सर्व राज्यांच्या आणि देशातील सर्व पक्षांच्या महिला नेत्यांनाही बोलवले आहे. संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक २७ वर्षांपासून प्रलंबित आहे.