Arvind Kejriwal (Marathi News) नवी दिल्ली : दिल्लीतील कथित अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राउज एव्हेन्यू कोर्टात हजर झाले. अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने त्यांना कोर्टात हजर राहण्यापासून दिलासा मिळावा, यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना आज म्हणजेच १७ फेब्रुवारीला कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले होते.
मद्य धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या पाच समन्सला उत्तर का दिले नाही? याचे उत्तर अरविंद केजरीवाल कोर्टात देणार आहेत. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी हजर न राहण्याचे कारणही कोर्टाला सांगितले. दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प आणि विश्वास प्रस्तावामुळे कोर्टात हजर राहता आले नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. ते म्हणाले, "मी येणार होतो, पण बजेट आले आहे; यापुढे कोर्ट कोणतीही तारीख देईल, तेव्हा मी येईन." यावर ईडीने विरोध केला नाही. त्यामुळे १६ मार्च रोजी कोर्टात पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी अरविंद केजरीवाल सकाळी १० वाजता हजर होतील.
दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने आतापर्यंत अरविंद केजरीवाल यांना पाच समन्स पाठवले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र ते एकदाही ईडीच्या कार्यालयात दाखल झाले नाहीत. आता ईडीने त्यांना सहावे समन्स पाठवले होते. यानंतर ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राउज एव्हेन्यू कोर्टात हजर झाले.
दरम्यान, आज दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला होता. ठराव मांडताना त्यांनी भाजपावर निशाणा साधत त्यांना खोट्या प्रकरणात गोवले जात असल्याचे सांगितले होते. यासोबतच भाजपा आपच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अरविंद केजरीवाल यांनी केला होता.